नाशिक : तीन दिवसांपूर्वी दारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याची वाटेतच प्रचंड चोरी होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी बालकृष्णन राधाकृष्णन यांनी थेट दारणा काठीच भेट देत पाणीचोरीविरुद्ध मोहीम हाती घेतली. सुमारे पन्नासहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाच किलोमीटर पायपीट करीत पाणी चोरण्यासाठी वापरातील वीजपंप जप्त करताना, जमिनीखाली गाडून ठेवलेले पाइप नष्ट केले व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली. सिन्नर औद्योगिक वसाहत, देवळाली आर्टिलरी सेंटर, नाशिक महापालिकेसाठी दारणा धरणातून २९ मे रोजी २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. नाशिकरोड येथील चेहेडी पंपिंग स्टेशनजवळील बंधाऱ्याजवळ पाणी अडविण्यात आल्याने पंपिंग स्टेशनच्या वरच्या बाजूला असलेल्या दारणा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाणीचोरीसाठी थेट नदीतच वीज पंप ठेवून रात्रंदिवस त्याचा उपसा सुरू केला. काहींनी नदीच्या पाण्याने शेतातील विहिरी भरून घेतल्या तर दोन दिवसांपासून शेतीत पाणी सोडण्यात आल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनाप्रमाणे पाणी मिळत नसल्याची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, नाशिक तहसीलदार जयश्री अहिरराव, औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत चेहेडी पंपिंग स्टेशन गाठले व तेथून थेट दारणानदी काठावरून पाच किलोमीटर पायपीट करून पाणीचोरी उघडकीस आणली. या मोहिमेत सुमारे एक डझन वीजपंप जप्त करण्यात आले असून, जमिनीखाली पुरून ठेवलेले पाइपही यंत्राच्या साहाय्याने तोडण्यात आले. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाणीचोरी केली अशांची माहिती गोळा करण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला देण्यात आले आहे.
दारणेच्या पाणीचोरीविरुद्ध धडक मोहीम
By admin | Published: June 01, 2016 11:05 PM