सिन्नर : नायलॉन मांजामुळे शहरातील उमाकांत नवले या युवकाचा गळा कापल्यानंतर नगर परिषदेने नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. शहरातील बाजारपेठेत पतंग व मांजा विक्रेत्यांच्या दुकानाची झाडाझडती घेत नगर परिषदेच्या पथकाने नायलॉन मांजा शोधून काढण्याचा प्रयत्न केला.मात्र या पथकाला नायलॉन मांजा मिळून आला नाही. नायलॉन मांजाने युवक जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर दुकानदारांनी रातोरात मांजा गायब केल्याचीही चर्चा आहे.गुरुवारी सकाळी उमाकांत नवले या तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची घटना घडली होती. रक्तवाहिनी कापल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली होती. या घटनेनंतर नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती.शुक्रवारी सकाळी नगर परिषदेचे अतिक्रमण व आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह सहा जणांच्या पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. शिवाजी चौक, कलंत्री बोळ, लोंढे गल्ली, मुंगी गल्ली, बुरुड गल्ली, वैद्य गल्ली या भागातील पंतग व मांजा विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात एकाही दुकानात नायलॉन मांजा आढळून आला नाही.अतिक्रमण विभागाचे प्रमुख नीलेश बाबीस्कर, स्वच्छता विभागाचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा पथकात समावेश होता. शिवाजी चौकातील सहा दुकानांची पाहणी केल्यानंतर विक्रेत्यांना नायलॉन मांजा विक्री न करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. पथकातील कर्मचाºयांनी दुकान, साठवणुकीची ठिकाणे तपासली. ही मोहीम कायम सुरू ठेवणार असल्याचे पथकाने सांगितले.
सिन्नर नगर परिषदेची नायलॉन मांजाविरोधात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:53 PM
नायलॉन मांजामुळे शहरातील उमाकांत नवले या युवकाचा गळा कापल्यानंतर नगर परिषदेने नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे.
ठळक मुद्देरातोरात झाला नायलॉन मांजा गायब; मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी