सिडको : पवननगर भागात सहा वर्षीय बालिका घरासमोर खेळत असताना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेत गंभीर जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर महापालिकेला जाग आली. बुधवारी (दि. १७) मनपाच्या वतीने सिडको भागात मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.सिडको भागातील मुख्य चौक, गल्ली बोळासह मांसविक्रीच्या दुकानांसमोर मोकाट तसेच पिसाळलेल्या श्वानांची दहशत वाढली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मोकाट श्वानांनी आजवर अनेकांवर हल्ला करीत जखमी केले असून, याबाबत नागरिकांनी मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक तसेच महापालिकेकडे केली असताना याकडे लक्ष दिले गेले नाही. बुधवारी नगरसेवक मुकेश शहाणे राहात असलेल्या पवननगर भागात सहा वर्षीय बालिका जयश्री महाले हिच्यावर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला करीत जखमी केल्याचा प्रकार घडला. नगरसेवकांच्या भागातच असा प्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या सर्व प्रकाराकडे नगरसेवक व मनपा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील पवननगर भागात मंगळवारी सकाळी जयश्री कुणाल महाले या सहा वर्षाच्या चिमुकलीवर ती घराच्या दरवाजासमोर उभी असताना मागून आलेल्या पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांच्या सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी श्वानाला पळवून लावले. घटनेनंतर पालकांनी जयश्रीला तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सिडको भागात मोकाट तसेच पिसाळलेल्या श्वानांनी दहशत पसरवली असून, याबाबत मनपा प्रशासन व स्थानिक नगरसेवकांना वारंवार कळवूनही दखल घेत नाही. याबाबत वेळीच दखल घेतली असती तर असा प्रकार घडला नसता. यापुढील काळात सिडको भागात पुन्हा असा प्रकार घडल्यास ज्या नगरेसवकांच्या प्रभागात असा प्रकार घडेल त्यांच्याच घरात सदर श्वान पकडून सोडणार आहे.- संतोष सोनपसारे, शहराध्यक्ष, महात्मा फु ले समता परिषद
महापालिकेच्या वतीने सिडकोत श्वान पकडण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:40 PM