लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिक महापालिका, तसेच नाशिकमधील सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोदाकाठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी दोन तासांच्या कालावधीत अकरा ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या माध्यमातून १६० टन कचरा जमा करून पाथर्डी शिवारातील खतप्रकल्पावर पाठविण्यात आला.सकाळी तपोवन कपिला संगम येथे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत या गोदावरी स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या स्वच्छता अभियानासाठी मनपाचे शेकडो कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. बालाजी मंदिर, आनंदवली, गंगाघाटावरील रामकुंड परिसर, गौरी पटांगण, य. म. पटांगण, म्हसोबा महाराज पटांगण, टाळकुटेश्वर पूल परिसर, लक्ष्मण झुला आदि परिसरातील केरकचरा उचलण्यात आला तर तपोवन कपिला संगम येथील नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर नांदूर मानूर येथील घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गोदावरी नदीवर सहा ठिकाणी, नासर्डी नदीवर तीन ठिकाणी तसेच वाघाडी व वालदेवीवर एकूण ११ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सभागृह नेता दिनकर पाटील, प्रभाग सभापती प्रियंका माने, नगरसेवक जगदीश पाटील, उपआयुक्त दोरकुळकर, आरोग्य विभागाचे डॉ. सुनील बुकाणे, डॉ. हिरे, पंचवटी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी आदि सहभागी झाले होते.या मोहिमेत मनपाला सहकार्य म्हणून शंकराचार्य न्यास, गुरुजी रुग्णालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मानवधन सामाजिक संस्था, युवक मित्रमंडळ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, विघ्नहर्ता ढोल पथक, तालरुद्र ढोल पथक, सुजाण नागरिक मंच, शंभूराजे प्रतिष्ठान, शिवयुवा प्रतिष्ठान, संत निरंकारी, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, नवनाथ पंथी सामाजिक संस्था, आदिंसह सत्तर संस्थांचे २७०० कार्यकर्ते तसेच महापालिकेचे अडीच हजार अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.