नाशिक : शहरात सुरू असलेल्या संततधारेमुळे ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत गाळ काढण्यासह खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी मनपाने सुमारे अडीचशे खड्डे बुजविले, तर १०८ ठिकाणी साचलेला गाळ व माती हटविण्याचे काम केले. शनिवारी (दि.६) शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मनपाने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, नाशिक पूर्व भागात ४७, पश्चिममध्ये ४२, पंचवटी परिसरात ५८, नाशिकरोडला ३७, सिडकोत २७, तर सातपूर भागात ३९ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. याशिवाय शहरात १०८ ठिकाणी साचलेला गाळ व माती काढण्याचेही काम करण्यात आले. मनपाने २४ जेसीबी, ३३ ट्रॅक्टर्स आणि पाच स्क्रॅपरच्या साहाय्याने सुमारे २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर खड्डे बुजविणे व गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, उंटवाडी पुलाजवळ पावसामुळे मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मनपाने सदर खड्डा बुजविण्याची कार्यवाही केली तसेच निर्मल रेसिडेन्सी याठिकाणीही पडलेला खड्डा बुजविण्यात आला. जलालपूर शिवारातील वऱ्हारेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरील माती हटविण्यात आली. (प्रतिनिधी)
गाळ काढण्यासह खड्डे बुजविण्याची मोहीम
By admin | Published: August 07, 2016 1:27 AM