एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील चांदगिरी, कालवी, पळसे, पिंप्रीसैय्यद, हिंगणवेढे, जाखोरी, शिलापूर, लाखलगाव-गंगापाडळी, माडसांगवी, शिंदे, मोहगाव-बाभळेश्वर या अकरा ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी मतदान होणार असून, निवडणुकीचा प्रचार संपुष्टात आल्यानंतरही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत छुपा प्रचार सुरुच ठेवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून गावागावातील राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या पाहता प्रत्यक्ष निवडणूूक रंगण्याची व्यक्त होणारी शक्यता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाली. मेळावे, बैठका, राजकीय डावपेचांनी वातावरण ढवळून निघालेले असताना बुधवारी सायंकाळी पाच वाजता निवडणुकीचा प्रचार संपुष्टात आला. आता शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच गावोगावच्या पॅनेल प्रमुखांनीही अधिकाधिक मतदान कसे होेईल, यासाठी तयारी केली आहे.
पूर्व भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे. काही अपक्ष उमेदवारही आपले नशिब आजमावत आहेत. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गावासह मळे विभागातून फिरुन प्रचार केला आहे. प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मतदान केंद उभारले आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाने पाहणी करुन निवडणूक शांततेत पार पडेल, असे नियोजन केले आहे. गेल्यावेळी जाखोरी, शिलापूर येथे आपापसात समझोता करुन बिनविरोध सत्ता स्थापन करण्यात आली होती. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात तरुणाई निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने व अनेकांनी डिजिटल तंत्रज्ञान, मोबाईल, व्हाॅट्सअॅप यासारखी माध्यमे खुबीने वापरुन प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे पूर्व भागातील निवडणूक चुरशीची होणार, असे सांगितले जात आहे.