नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी येत्या २८ मार्चला मतदान होणार आहे़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश असून, सर्वांचा जोरदार प्रचार सुरू आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील एक लाख १२ हजार वकील या निवडणुकीत मतदान करणार असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या १४ दिवसांचा कालावधी उरल्याने वकिलांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीबरोबरच सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे़ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदासाठीच्या इच्छुकांनी सुमारे वर्षभरापासूनच या प्रचारास सुरुवात केली होती़ महाराष्ट्र तसेच गोवा येथे वकिलांच्या होणाऱ्या विविध परिषद, कार्यक्रम यासाठी इच्छुक आवर्जून हजेरी लावीत होते़ या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची २८ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होऊन उमेदवारांना मतपत्रिकेतील अनुक्रमांकाचे वाटप करण्यात आल्यानंतर प्रचारास खºया अर्थाने सुरुवात झाली़ मात्र, अनुक्रमांक मिळाल्यानंतर मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने उमेदवारांनी जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सदस्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून, सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप, फेसबुक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे़ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड़ बाळासाहेब आडके, अॅड़ विवेकानंद जगदाळे, अॅड़ लीलाधर जाधव, अॅड़ अनिल शालिग्राम हे आठ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये २८ मार्चला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे़महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलसाठी २०१० मध्ये निवडणूक झाली होती़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल आठ वर्षांनी ही निवडणूक घेतली जात असून, महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील एक लाख १२ हजार वकील यासाठी मतदान करणार आहेत़ नाशिक जिल्ह्यातील वकील मतदारांची संख्या चार हजार ५०० आहे़ या निवडणुकीत प्रत्येक वकील मतदारास कमीत कमी पाच, तर जास्तीत जास्त २५ मते देण्याचा अधिकार असून, या निवडणुकीद्वारे कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार आहेत़ या निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाºयांची निवड केली जाते़
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी प्रचारास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 7:19 PM