सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. शुक्रवार, दि. २७ पासून भोजापूर धरण क्षेत्रातील तीन गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे. अवैध वीजजोडण्या तोडण्यासह अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी गरज असलेल्या तीन गावातील सुमारे १७ ठिकाणचे वीज रोहित्र उतरविण्याची कारवाई केली जाणार आहे. भोजापूर धरणात यावर्षी केवळ ५२ टक्के पाणी आले होते. त्यापैकी धरणात आता केवळ ४० टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक राहिले आहे. या धरणातील मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. यावर्षी धरण न भरल्याने रब्बीसाठी आवर्तन सुटेल की नाही याची शाश्वती नसताना धरणातून अवैध पाणी उपसा केला जात होता. याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. धरणातील पाणी पाणीपुरवठा योजनांसाठी आगामी पावसाळ्यापर्यंत शिल्लक राहावे यासाठी अवैध पाणी उपसा रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. भोजापूर प्रकल्पाच्या जलाशया सभोवतालचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीच्या सहकार्याने यापूर्वीच खंडित केला आहे. तथापि, अजून धरण फुगवटा क्षेत्रालगतच्या व ३५ मीटरच्या अंतरावरील खासगी विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अनाधिकृतपणे उपसा होत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
पाणी उपसा रोखण्यासाठी मोहीम
By admin | Published: November 26, 2015 9:57 PM