२०१५ मध्ये रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीदेखील या मुद्द्यावर राज्य सरकारकडे मागणी केली होती. ओझरजवळील हा प्रकल्प दादासाहेब गायकवाड यांच्या त्यागातून आणि प्रयत्नातून साकारला असल्याचे त्यावेळी आठवले म्हणाले होते. विमानतळाला गायकवाड यांचे नाव देणेच उचित असल्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर सातत्याने राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली होती. मात्र त्यांच्या मागणीला यश आले नाही.
मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाचा वाद सुरू झाल्यानंतर नाशिकमध्येदेखील ओझर विमानतळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी सोशल मीडियाचा आधार घेऊन जनमत तयार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने, लोकप्रतिनिधींना पत्रे पाठविणे, सह्यांची मोहीम, मानवी साखळी असे उपक्रम करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते.
नाशिक शहराबरोबरच दिंडोरी तालुक्यातील नागरिकही गायकवाड यांच्या नावासाठी आग्रही असून, त्यांच्याकडूनही या मोहिमेला पाठबळ मिळत आहे. सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यााबाबतची आपली मते सोशल मीडियावर उमटविली असून, दिवसेंदिवस या मोहिमेत लोक सहभागी होऊ लागले आहेत.