नाशिक : शहरातील शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी (दि.२३) सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमाणेच वाहतुकीचेही संतुलन हरविल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले.शहरातील सिग्नलव्यवस्थेवरील नियंत्रण आणि देखभालीची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून शहर पोलीस आयुक्तालयाकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र तत्पूर्वीच दुसरीकडे शहरातील सिग्नल यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सिग्नल यंत्रणा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील अत्यंत वर्दळीच्या चौकातील सिग्नलची अशी अवस्था मंगळवारी होती, यावरूुन अन्य सिग्नलचाही अंदाज सहज लावता येऊ शकतो. एकीकडे वाहनचालकांकडून सिग्नलचे पालन होत नसल्याची ओरड वाहतूक पोलिसांकडून होत असली तरी दुसरीकडे सिग्नल दुरुस्ती आणि नियंत्रणाविषयी मात्र मनपा व पोलीस प्रशासनाने काणाडोळा करणे पसंत केले आहे. त्याचप्रमाणे रेड क्रॉस चौकातील सिग्नलचेही काही दिवे नादुरुस्त झाले आहेत. रविवार कारंजाकडून नेहरू गार्डनकडे जाताना या मार्गावरील सिग्नल जेव्हा हिरवा होतो, तेव्हा दिवा प्रज्वलित होत नसल्याने नेमका सिग्नल चालू आहे, की बंद हेच वाहनचालकांना समजणे अवघड होत आहे. एकूणच शहरातील सिग्नलवरील दिवे तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पारिजातनगर येथील सिग्नल यंत्रणाही मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. पारिजातनगरचा सिग्नल कधी चालू तर कधी बंद अशी स्थिती असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच गंजमाळ सिग्लचेही काही दिवे बंद राहत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसून येतो. शहरातील सिग्नलला नेमका वाली कोण, असा सवाल संतप्त नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
कॅनडा कॉर्नर सिग्नल नादुरुस्त; वाहनचालकांची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:59 PM
नाशिक : शहरातील शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी (दि.२३) सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमाणेच वाहतुकीचेही संतुलन हरविल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले.
ठळक मुद्देवाहतूक विस्कळीत : अपघातांना मिळतेय निमंत्रण