सिग्नल बंद पडल्याने खोळंबा
नाशिक : शहरातील काही चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मनपाने सिग्नल यंत्रणा देखभाल, दुरुस्तीचे काम पोलीस प्रशासनाकडे वर्ग केल्याने ही समस्या निर्माण झाल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये होत आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर
नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ७ वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याने अनेक व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आधीच अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना या निर्बंधामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट
नाशिक : दिवसागणिक उन्हाचा चटका जाणवू लागल्याने दुपारच्यावेळी अनेक भागातील रस्त्यांवर सामसूम होत आहे. तीव्र उन्हामुळे अनेक नागरिक सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत आपली बाहेरची कामे उरकून घेत आहेत. नागरिक शक्यतो दपारच्यावेळी बाहेर पडणे टाळत आहेत. यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो.
संसर्ग वाढल्याने भीतीचे वातावरण
नाशिक : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिक आपल्या अहवालाबाबत जाहीर वाच्चता करत नाहीत, यामुळे अनेक परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत महापालिकेने खबरदारी घेऊन संबंधितांच्या घरासमोर फलक लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन
नाशिक : ज्यांना आधी कोरोना होऊन बरा झाला असेल, अशा नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना त्यांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. अशा नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही सांगण्यात येत आहे.
पाटाला पाणी सोडण्याची मागणी
नाशिक : ग्रामीण भागात अनेक विहिरींनी तळ गाठल्याने ज्यांनी उन्हाळी पिके केली आहेत, अशा शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पाण्याअभावी पिके करपण्याची भीती व्यक्त होत असून, पाटाला पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
विवाह सोहळ्यांबाबत निर्णय घेण्याची मागणी
नाशिक : विवाह सोहळ्यांवर १५ मार्चनंतर निर्बंध घातले गेल्यामुळे अनेक वधू-वर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत शासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कांशीराम जयंती कार्यक्रम रद्द
नाशिक : बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त दि. १५ मार्च रोजी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. या पत्रकावर अरुण काळे, किशोर जाधव, देविदास तेजाळे, दीपक औटे, सदानंद जाधव आदींची नावे आहेत.
भाजीपाला दरावर परिणामाची शक्यता
नाशिक : शहरात संध्याकाळी ७ वाजल्यानंतर संचारबंदी लागू होत असल्याने बाजार समितीमध्ये शेतीमालाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकरी परिस्थितीचा अंदाज घेऊन भाजीपाला आणत आहेत.