नाशिक : बाजार समित्यांमध्ये शेतक-यांचा माल खरेदी करून त्यांना सात ते आठ महिने उशिरा पैसे अदा करणा-या जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांमधील व्यापा-यांची चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. यापुढे शेतक-यांना त्यांच्या मालाचे पैसे धनादेशाद्वारे नव्हे तर त्याच दिवशी आरटीजीएस करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या तसेच बेकायदेशीर सावकारी करणा-यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.सहकारमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सहकार निबंधक, जिल्हा बॅँक, पणन महामंडळ व बाजार समित्यांच्या सचिवांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देशमुख यांनी विषयानुसार आढावा घेतला. बाजार समित्यात शेतक-यांचा माल खरेदी करूनही त्यांना तत्काळ पैसे न देता सात ते आठ महिने उशिराचे धनादेश दिले जात असल्याची बाब देवळा, मालेगाव, चांदवड या बाजार समितीत होत असल्याचे उघड आल्यावर देशमुख यांनी शेतक-यांना त्याच्या मालाचे पैसे तत्काळ देण्याची सोय करण्यात यावी व त्यासाठी धनादेश देण्याची पद्धत बंद करून शेतक-यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी आरटीजीएस करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना सर्वच बाजार समित्यांच्या व्यापा-यांना देण्यात याव्या, असे सांगितले. तसेच शेतक-यांचे पैसे थकविणा-या शेतक-यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, असे आदेश दिले. यावेळी शासनाने परवाने दिलेल्या सावकारांकडून दिले जाणारे कर्ज व बेकायदेशीर सावकारी करणा-यांची माहिती घेण्यात आली. शासनाने सावकारांना कर्जाचे व्याज ठरवून दिलेले असतानाही त्यापेक्षा अधिक व्याजाची आकारणी होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्याचबरोबर बेकादेशीर सावकारी करणा-यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. यातील काही प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्याने त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.या बैठकीत सहकारमंत्र्यांनी आर्थिक डबघाईस आलेल्या व अवसायनात निघालेल्या नागरी बॅँकाचाही आढावा घेतला. जिल्ह्यात सिन्नर नागरी सहकारी बॅँक, बालाजी सहकारी बॅँक, श्रीराम व नांदगाव मर्चंट बॅँक अवसायनात निघाल्याने त्यावर अवसायकांची नियुक्ती करण्यात आली असून, १५३.६१ कोटी रुपयांच्या ठेवी अदा करण्यासाठी कर्जवसुलीला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, डॉ. राहुल अहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर आदी उपस्थित होते.
पैसे थकविणा-या व्यापा-यांचे परवाने रद्द करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:20 PM
बाजार समित्यात शेतक-यांचा माल खरेदी करूनही त्यांना तत्काळ पैसे न देता सात ते आठ महिने उशिराचे धनादेश दिले जात असल्याची बाब देवळा, मालेगाव, चांदवड या बाजार समितीत होत असल्याचे उघड आल्यावर देशमुख यांनी शेतक-यांना त्याच्या मालाचे पैसे तत्काळ देण्याची सोय करण्यात यावी
ठळक मुद्देसुभाष देशमुख : सावकारांचाही फास आवळणारपैसे धनादेशाद्वारे नव्हे तर त्याच दिवशी आरटीजीएस करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सूचना