मालेगाव : अजंग ग्रामस्थांची ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रारमालेगाव : तालुक्यातील अजंग येथील स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक २च्या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. या तक्रारींची ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी गंभीर दखल घेत तहसिलदार ज्योती देवरे व पुरवठा अधिकाऱ्यांना दुकानदाराचा परवाना रद्द करण्याच्या सूचना करण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.तालुक्यातील अजंग येथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून शिधापत्रिका धारकांना सुरळीत धान्य पुरवठा केला जात नव्हता. तसेच शिधापत्रिकेवरील धान्य नियमानुसार वाटप केले जात नाही. ग्राहकांना सापत्न वागणूक दिली जाते. यामुळे संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांची भेट घेऊन तक्रार केली. भुसे यांनी संबंधित दुकानदाराचे परवाना रद्द करण्याच्या सूचना महसुल विभागाला दिल्या जातील असे आश्वासन दिले. यावेळी महिलांनी संजय गांधी योजना, घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, ग्रामपंचायतीकडून शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जात नसल्याची तक्रार केली. यावर ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी गावात विशेष पथक पाठवून संजय गांधी योजनेचे अर्ज भरुन घेतले जातील. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल असे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.मुक्ताई बचत गटाच्या नावावर असलेले स्वस्तधान्य दुकान संबंधित दुकानदाराने दिशाभुल करुन स्वत:च्या नावावर करुन घेतले आहे. दर महिन्याला ग्राहकांना अपुरा धान्यपुरवठा केला जात असल्याचा आरोपही अजंग येथील ग्रामस्थांनी केला आहे.