देवळाली कॅम्प : येथील बालगृह मार्गावर विनापरवानगी आयोजित कार्यक्रमाला राज्यभरातून नागरिक आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या धार्मिक कार्यक्रमाला कोणी परवानगी दिली व पोलीस आयोजकांवर काय कारवाई करणार, याविषयी उलटसुलट चर्चा आता होऊ लागली आहे.
येथील बालगृह मार्ग परिसरात असलेल्या कलापूर्णम तीर्थधाम येथे विनापरवानगी आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी राज्यभरातून पाचशेहून अधिक नागरिक दाखल झाले आहेत. या कार्यक्रमासाठी पन्नास लाख रुपये खर्च करुन सजावट व जेवणासाठी विशेष सोय करण्यात आली होती. अंतिम विधीसाठी व लग्नासाठी २५ जणांची परवानगी असताना एवढ्या मोठ्या संख्येने देशभरातून नागरिक दाखल झाले असून, येथील मंदिरात भव्य प्रमाणात कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात आला, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाने देशभरातील मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना, एकिकडे कारवाईसाठी गेलेल्या छावनी परिषदेच्या पथकाला सार्वजनिक ठिकाणी विनामास्क अनेकजण आढळून आले. त्यात सामूहिक जेवणावळी सुरु होत्या. याप्रकरणी देवळाली छावनी परिषदेने संचारबंदीचा नियम मोडल्याप्रकरणी ५० हजार रूपये दंड करत कार्यक्रम तत्काळ स्थगित करण्याचा आदेश घटना व्यवस्थापक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी दिले. दरम्यान, धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने येथील विविध सॅनटोरियममध्ये देशाच्या विविध भागातील पाचशेहून अधिक नागरिक हजर राहिल्याने बालगृह मार्ग परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे यांनी कलापूर्णम येथे येऊन पाहणी करून छावनी परिषदेला माहिती दिली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी याठिकाणी भेट देत या कार्यक्रमाचे आयोजन तातडीने थांबविण्याचे आदेश दिले.