निफाड : परिवहन महामंडळाने राज्यातील एशियाड बस विनावाहक करण्याच्या व या बसचे थांबे कमी करण्याच्या निर्णयाचा फटका निफाड व परिसरातील गावांतील प्रवाशांना बसत असून, याबाबत प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नाशिक व औरंगाबाद आगाराच्या बसेस निफाड, येवला, वैजापूरमार्गे ये-जा करीत असतात. यात एशियाड व लाल बसेसचा समावेश आहे. परंतु परिवहन महामंडळाने अचानक एशियाड बसेस या विनावाहक करण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबादहून निघालेली औरंगाबाद- नाशिक एशियाड बस वैजापूर थांबा टाळून येवला येथे थांबा घेऊन नंतर निफाड थांबा टाळून एकदम नाशिकला जाते, तर नाशिकहून औरंगाबादला जाणारी एशियाड बस निफाड व येवला थांबा टाळून वैजापूर थांबा घेऊन एकदम औरंगाबादला जाते. यामुळे निफाड बसस्थानकात येणाऱ्या बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे निफाड व परिसरातील गावांतील प्रवाशांना नाशिक व औरंगाबादकडे ये-जा करण्यासाठी इतर बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, निफाड येथून नाशिक व औरंगाबादकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एशियाड बससाठी निफाड रद्द करणे म्हणजे महामंडळाचा हा आत्मघातकी निर्णय होय. एशियाड बसेस तर बंद झाल्याच पण त्याबरोबरच निफाडमार्गे सायंकाळी व रात्री ये-जा करणाऱ्या ३ ते ४ परिवर्तन बसेसही परिवहन महामंडळाने बंद केल्या आहेत. निफाड बसस्थानकात संध्याकाळी ७ वाजता येणारी पैठण-नाशिक, रात्री ८ वाजता येणारी सिल्लोड-नाशिक, रात्री ८.३० वाजता येणारी औरंगाबाद-नाशिक या परिवर्तन बसेस बंदच करून टाकल्याने परिवहन महामंडळाने निफाडकरांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. त्यामुळे सायंकाळी ७.४० नंतर निफाडकरांना नाशिकला जायला आता बसच उपलब्ध नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सायंकाळी ७.४० वाजता लासलगाव-नाशिक ही बस नाशिकला जाण्यासाठी आहे. परंतु त्यानंतर रात्री ९.३० वा. असणारी बोरिवली-नाशिक ही बस जरी असली तरी ही बस रात्री निफाड बसस्थानकात येतच नाही. आता असे वाटायला लागले की निफाडकर दुर्गम डोंगराळ भागात राहतात की काय? नाशिकला जाण्यासाठी औरंगाबाद आगाराच्या किंवा लासलगाव आगाराच्या निफाड मार्गे बसेस रात्री ८ व ९ वाजता निफाडला येतील अशा पद्धतीने सोडाव्यात त्यामुळे रात्री नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल, अशी मागणी निफाडकरांनी केली आहे. थोडक्यात, एशियाड बसेसचा थांबा निफाडला रद्द झाल्याने व काही परिवर्तन बसेस रद्द केल्याने त्याची भर काढण्यासाठी नाशिक वा औरंगाबाद आगाराने निफाड, येवला, वैजापूरमार्गे नाशिक व औरंगाबादला ये-जा करण्यासाठी निदान ५ ते ६ नवीन परिवर्तन बसेस सुरू कराव्या, अशी मागणी निफाडकरांनी केली आहे.
थांबे रद्द केल्याने प्रवाशांचे हाल
By admin | Published: August 28, 2016 10:34 PM