नाशिक : यंदा कधी नव्हे ते उमेदवारी निश्चितीवरून राजकीय पक्षांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. युती-आघाडीतील मतभेद पक्षांतरामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी असलेली रस्सीखेच यामुळे राजकीय पक्षांपुढेच पेच निर्माण झाला आहे. हा पेच केवळ बड्या राजकीय पक्षांपुढेच आहे असे नाही तर लहान-मोठ्या पक्षांनाही आहे. मोठ्या राजकीय पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी तर लहान-मोठ्या पक्षांना चांगल्या उमेदवारांची प्रतीक्षा, असे विचित्र चित्र यंदा निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीत सध्या पक्षांना नव्हे तर उमेदवारांनाच महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांचे इतके पीक आले आहे की एकावर एक वरचढ उमेदवार असल्याने आणि लढण्यासाठी त्यांना कोणताही पक्ष वर्ज्य नसल्याने बलाढ्य उमेदवारांसाठी राजकीय पक्षांनी गोपनीयता बाळगली आहे. त्यांचे नाव जाहीर करून निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखावण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर न करता त्यांना थेट एबी अर्ज देण्याची व्यवस्था केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नॉट रिचेबल झाले आहेत. पक्षीय कार्यालयातही कुणी फिरकत नसल्याने उमेदवारांची फरफट झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एका दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने शुक्रवार, दि. ३ रोजी पक्षीय उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यामध्ये खरी चुरस असणार आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मिळाल्यानंतर होणारे शक्तिप्रदर्शन तसेच नाराजांकडून नाराजी उघडपणे दाखविली जाण्याची शक्यता असल्याने वातावरणही काहीसे तणावाचेच राहणार असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. भाजपामध्ये इनकमिंग जोरात झाल्याने आलेल्या प्रत्येकालाच शब्द देण्यात आल्यामुळे या पक्षापुढेही उमेदवारी वाटपाबाबतचा पेच आहे. अशीच काहीशी परिस्थिती शिवसेनेची आहे. त्यांच्याकडेही इनकमिंग जोरात सुरू झाल्याने त्यांनाही निष्ठावान आणि पक्ष प्रवेश केलेल्यांना सांभाळून उमेदवारी वाटप करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरच उमेदवारांची नावे जाहीर करण्याबाबतची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
उमेदवार असून अडचण नसून खोळंबा
By admin | Published: February 03, 2017 1:03 AM