इंदिरानगर : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी सरळ प्रवेश भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी (दि.९) इंदिरानगरमधील परीक्षा केंद्रावर एक तोतया परीक्षार्थीने हजेरी लावल्याचे उघडकीस आले. सुरक्षारक्षकांनी धातुशोधक यंत्राने तपासणी केली असता त्याच्या बुटामध्ये मोबाइल आढळला. तसेच त्याची कागदपत्रे बनावट असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी डमी उमेदवाराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी म्हाडाच्या विविध पदांसाठी ऑनलाइन परीक्षा गुरू गोविंद महाविद्यालयात दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या दरम्यान होती. परीक्षेचे आयोजन टाटा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आले होते. कंपनीचे केंद्रप्रमुख देवेंद्र मोजाड व सुरक्षारक्षक संजय आहेर यांच्याकडून तपासणी करून परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडले जात होते. साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रवेशद्वारावर आहेर यांनी परीक्षार्थी ज्ञानेश्वर श्रीमंत डिघुळे (२२, रा. बिबेवाडी, औरंगाबाद) याची तपासणी केली. त्याने बुटामध्ये मोबाइल दडविल्याचे उघडकीस आले. त्याची अंगझडती घेतली असता एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसदेखील सापडले. मूळ आधारकार्ड व ओळखपत्रावरील छायाचित्रामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. छायाचित्र हे परीक्षेतील मूळ परीक्षार्थी चोटीराम सीताराम बहुरेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याऐवजी संशयित डमी परीक्षार्थी ज्ञानेश्वर याने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्रावरून त्यास अटक केली आहे. कनिष्ठ अभियंता आशिष आंबेकर (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---इन्फो--
२० हजारांमध्ये देणार होता ‘परीक्षा’
मूळ परीक्षार्थी चोटीराम बहुरे याने संशयित ज्ञानेश्वर याला २० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
सांगून बहुरे याने परीक्षा देण्यासाठी वीस हजार रुपये देणार असल्याचे कबूल केल्याचे सांगितले. खरा परीक्षार्थी चोटीराम बहुरे येथे मिळून आला नाही. त्याच्या कागदपत्रांवरून पोलिसांकडून पुढील शोध घेतला जात आहे.
---इन्फो--
म्हाडाच्या लिपिक पदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका परीक्षार्थ्याने कॉपीसाठी गैरमार्ग अवलंबल्याचे उघडकीस आले. संशयित योगेश सीताराम बहुरे असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यात परीक्षा खोलीत मोबाइल व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तपासणीदरम्यान आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.