नाशिक : स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरपंचपदाच्या १७१ जागांसाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया नाशिक जिल्ह्णातील १७१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच ठिकाणी इच्छुकांची झुंबड उडाली. राज्य सरकारने सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच होणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. राज्यात झालेले सत्तांतर व त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे वाहिल्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविता येणार नसल्या तरी, प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद अजमाविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारांचे पॅनल तयार केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे. जिल्ह्णात १७१ ग्रामपंचायतींसाठी ५९३ प्रभागातील १६४७ जागांसाठी येत्या ७ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३९६७ उमेदवारांनी, तर सरपंचपदासाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची सोमवारी छाननी करण्यात येणार असून, २७ सप्टेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत व त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठीही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या खर्चमर्यादेतच उधळपट्टी करता येणार आहे.
थेट सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:04 AM