नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, हजार-बाराशेच्या पुढे नामांकन अर्ज ऑनलाइन दाखल झालेले आहेत. गेल्या सोमवारी ऑनलाइन अर्ज सादर करताना इच्छुकांना अनेक तांत्रिक अडचणी आल्याने आता इच्छुक उमेदवार पूर्वीप्रमाणेच आपल्या तहसीलमधील निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्र दाखल करू शकणार आहेत. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याची वेळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरावे लागणार असल्याने गेल्या २३ तारखेपासून इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी लागणारा विलंब आणि येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काहीशी संथ सुरू असून पहिल्या दिवशी दोन तर दुसऱ्या दिवशी ११५ इतकेच अर्ज प्राप्त झाले होते. साडेपाच हजारांपेक्षा अधिक जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तीन दिवसांत केवळ हजार-बाराशे इतकेच अर्ज दाखल झाले. त्यातच गेल्या सोमवारी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना या दिवशी नामनिर्देशनपत्र अर्ज भरताच आले नाही. इंटरनेटला गती नसल्याने होणारा विलंब तसेच सर्व्हर अनेकदा डाऊन होण्याचे प्रकारदेखील घडत आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास अवघे दोन दिवस राहिले असल्याने त्याच येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत इच्छुकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने इच्छुक उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहू नयेत तसेच त्यांना पुरेपूर संधी मिळावी यासाठी नामनिर्देशनपत्र पूर्वीप्रमाणेच पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत दि. ३० डिसेंबर २०२० दुपारी ३ इतकी होती. आता वेळेत वाढ करण्यात येऊन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत.
--इन्फो--
निवडणूक शाखेने आयोगाच्या आदेशाप्रमाणे तत्काळ तालुका पातळीवर तहसीलदारांना पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात यावेत, असेदेखील आदेश देण्यात आलेले आहेत. नामनिर्देशनपत्र व घेाषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्यादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे यााबबतची विचारणा केल्यास त्यांना माहिती मिळू शकणार आहे.