नाशिकरोड : कथुआ व उन्नाव येथील बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्ष, संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने रात्री परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. तसेच महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. तसेच उन्नाव येथेदेखील अत्याचाराची घटना घडली. देशात मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या निषेधार्थ व संशयितांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी रात्री शिवाजी पुतळा येथून सर्व पक्ष, संघटना, संस्था, मंडळे आदींच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. बिटको, मुक्तिधाम, सत्कार पॉइंट, सुभाषरोड मार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.महसूल आयुक्तांना निवेदन देशात बालिकांवर झालेल्या निर्घृण अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ नाशिकरोडला सर्वधर्मिय व सामाजिक, राजकीय पक्षाच्या कृती समितीतर्फे मार्च काढण्यात येऊन विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले. विभागीय महसूल आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कथुआ, उन्नाव, सुरतमधील रोहतक येथील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, बलात्काराच्या निर्घृण घटना घडू नये म्हणून कायदे कडक करावेत, सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून एक महिन्यात निकाल द्यावेत, त्यांच्या पालकांना संरक्षण देऊन आर्थिक मदत द्यावी, त्यांचे पुनर्वसन करावे, पीडितांना लवकरात लवकर न्याय द्यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर सूर्यकांत लवटे, निवृत्ती अरिंगळे, शरद आहेर, निर्मला गावित, हेमलता पाटील, गजानन शेलार, भाईजान बाटलीवाला, रईस शेख, संतोष क्षीरसागर, मुजीर जिलानी, शशिकांत उन्हवणे, शिवाजी भोर, नितीन चिडे, राजाभाऊ जाधव, हरिष भडांगे, मनोहर कोरडे, आशा तडवी, मसुद जिलानी, पोपट हगवणे, कामिल इनामदार, विलास गांगुर्डे, जावेद पठाण, कलीम शेख, कुसुमताई चव्हाण, मुन्ना मन्सूरी, इम्तियाज सय्यद आदींच्या सह्या आहेत.आगर टाकळी येथे मूक मोर्चाकथुआ व उन्नाव येथे बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आगर टाकळी येथे युवक कॉँग्रेसच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होत. कथुआ व उन्नाव येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आगर टाकळी येथील भाऊ बंगल्यापासून काढण्यात आलेला मोर्चा भीमशक्तीनगर, संत गाडगे महाराज वसाहत, समतानगर मार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आला होता. यावेळी अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेण्यात आली. मूक मोर्चामध्ये नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी, सुषमा पगारे, जयेश सोनवणे, महेश बाफना, संदीप दिवे, आकाश रणशूर, मनिष वडनेरे, सचिन पगारे, पापा सय्यद, वसीम शेख, मिलिंद हांडोरे, संजय लोखंडे, मुकुंद बागुल, चेतन जाधव आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नाशिकरोड परिसरात कॅन्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:18 AM