कॅन्टोन्मेंट कामगार युनियनचे अध्यक्ष एम. आय. खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे सेवानिवृत्ती वेतन गेल्या वर्षभरापासून वेळेवर होत नाही. सध्या मार्च, एप्रिलचे वेतन मिळालेले नाही, जेव्हा युनियन पदाधिकारी याबाबत सीईओ यांची भेटी घेतात तेव्हा वेळकाढूपणा केला जात असून, याबाबत डीजी (दिल्ली) व सीडीए (पुणे) या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून निधी पाठविला असल्याचे सांगितले जाते. मग हा निधी देवळालीला का मिळाला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पगार नसल्याने कर्मचारी वर्गाचे हाल होत आहेत, त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकीत होऊन व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच घर, गाडी, यांचे व्याज दुप्पट होऊन अधिकचा फटका बसत असल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी खासदार गोडसे यांनी दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी एक महिन्यापूर्वीच १० कोटी रुपये वेतनासाठी मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र, प्रशासकीय पूर्तता करणे गरजेचे असून, देवळाली कॅन्टोन्मेंट प्रशासनाने त्याची पूर्तता केल्यास आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगण्यात आले. यावेळी सुरेंद्र मेहरोलीया, रोहिदास शेंडगे, केशव शिंदे, केशव बोराडे, डॉ. उन्मेष पत्की, चित्रा सोनवणे, उषा डेंगळे, सतीया शेख, रेखा परदेशी, सरोज सारस, शिवाजी सपकाळे, संजू रजोरा, जगपाल चडालिया, सचिन पगारे, कमल किशोर, विलास चांदणे, प्रताप चटोले आदी उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंटमधील कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:15 AM