- अझहर शेख
नाशिक - भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला अधिकारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरियाणा राज्याच्या मुळ रोहतक येथील रहिवाशी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला आहे. त्यांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ३७व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी बुधवारी (दि.२५) ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कॅप्टन अभिलाषा यांनी २०१८साली चेन्नईच्या अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण करत आर्मी एव्हीएशन कोरची निवड केली. त्यानंतर त्या नाशिकच्या 'कॅट्स'मध्ये दाखल झाल्या. पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून अभिलाषा यांनी अठरा आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांचे वडील कर्नल एस ओम सिंह हेदेखील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहेत. तसेच त्यांचा भाऊसुद्धा २०१३सालापासून सैन्यदलात कार्यरत आहेत. कुटुंबाकडे सुरूवातीपासूनच असलेल्या सैन्यदलाच्या सेवेचा वारसा अभिलाषा यांनीही पुढे सुरू ठेवला आहे.
गुंजन सक्सेनाप्रमाणे ‘चित्ता’चे उड्डाणभारतीय हवाई दलात १९९४साली भरती झालेल्या गुंजन सक्सेना या हेलिकॉप्टर वैमानिकाने कारगिल युद्धात भाग घेत महत्वपुर्ण कामगिरी बजावली होती. त्यांनीसुद्धा चित्ता हेलिकॉप्टरचे उड्डाण केले होते. भारतीय सैन्य दलातून महिलांना यापुर्वी लढाऊ वैमानिक होण्याची संधी मिळत नव्हती. पहिल्यांदाच महिलांना सैन्यदलातून हेलिकॉप्टर वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आणि कॅप्टन अभिलाषा बराक यांनी या संधीचे सोने केले. त्यांनीही कॅट्सच्या हवाई तळावरून चित्ता, चेतक, ध्रूवसारखे लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे उड्डाण करत शास्त्रोक्त प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत प्राविण्य मिळवले.