नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून सिडकोतील सिंहस्थनगरमधील एका संशयिताकडून देशी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली़ संदीप मधुकर शिंदे (३३, रा़ गंगासागर रो- हाउस नंबर २८, सिंहस्थनगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे़ सिडकोतील संभाजी स्टेडियममध्ये एक तरुण देशी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर यांना मिळाली होती़ या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ, पोलीस नाईक संजय ताजणे, मोतीलाल महाजन, देवकिसन गायकर, राहुल सोळसे, नितीन भालेराव, मधुकर साबळे यांनी शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी सापळा रचला़ साडेसहा वाजेच्या सुमारास संशयित संदीप शिंदे हा संभाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वारातून आत येताच त्यास ताब्यात घेण्यात आले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे, असा २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला़ या प्रकरणी संशयित संदीप शिंदे विरोधात अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:47 AM