लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.२६) कार्यकारिणीची बैठक होण्यापूर्वीच पदसिद्ध अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी गुरुवारी थेट महापालिकेत धडक मारत युनियनच्या कार्यालयाचा कब्जा घेतला आणि यापुढे आपणच अध्यक्षपदी राहणार असल्याची भूमिका जाहीर केली. घोलप यांच्या या पवित्र्यामुळे कामगार सेनेतील वाद आणखी चिघळला असून, संघटना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. दरम्यान, शुक्रवारी कार्यकारिणीच्या होणाऱ्या बैठकीतील निर्णयाकडे आता लक्ष लागून असणार आहे.म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष शिवाजी सहाणे यांना हटवून त्यांच्या जागेवर नगरसेवक प्रवीण तिदमे यांना बसविण्याचा प्रयत्न माजी मंत्री बबन घोलप यांनी केला. परंतु, घटनेतील तरतुदींना डावलत झालेल्या या नियुक्तीमुळे शिवाजी सहाणे यांच्यासह कार्यकारिणीने त्यास तीव्र आक्षेप घेतला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी शिवाजी सहाणे आणि प्रवीण तिदमे यांना एकत्र आणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार, सहाणे यांनी शुक्रवारी (दि.२६) कार्यकारिणीची बैठकही दुपारी ३ वाजता बोलाविली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपूर्वीच गुरुवारी बबन घोलप यांनी सकाळी महापालिकेच्या मुख्यालयात येत युनियनच्या कार्यालयाचा कब्जा घेतला आणि अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होत पत्रकारांशी बोलताना यापुढे आपणच अध्यक्ष असल्याचा दावा केला. यावेळी घोलप यांनी सांगितले, सदर युनियन मी स्वत: स्थापन केली असून, आपण पदसिद्ध अध्यक्ष कायम आहोत. मी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर युनियनची सूत्रे अशोक गवळी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर अध्यक्षपद बदलत राहिले. परंतु, ही मंडळी केवळ नाममात्र होती. अध्यक्षपदी मीच कायम आहे. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही, त्यामुळे युनियनचे अध्यक्षपद सांभाळणार असून, कामकाजासाठी वेळही देणार आहे. युनियनची विस्कळीत झालेली घडी बसविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिवाजी सहाणे यांनीच केलेल्या विनंतीनुसार, आपण तिदमे यांना नियुक्तीपत्र दिले होते. परंतु आता शिवाजी सहाणे व प्रवीण तिदमे हे दोघेही अध्यक्षपदी नसून आपणच धुरा सांभाळणार असल्याचेही घोलप यांनी स्पष्ट केले. यावेळी, गटनेता विलास शिंदे, प्रवीण तिदमे यांच्यासह कार्यकारिणीतील काही पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षपदावर बबन घोलप यांचा कब्जा
By admin | Published: May 26, 2017 12:05 AM