सिडको : परिसरात रिक्षा, मोटारींच्या बॅटऱ्या चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीने सिडकोवासीयांना त्रस्त केले होते. याबाबत अंबड पोलिसांकडे तक्रारींचा ओघ सुरू असताना पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाने गुप्त माहितीच्या आधारे एका संशयिताकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या चारचाकी वाहनांच्या २७ बॅटऱ्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.वाहनचोरीबरोबरच वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा मूळ झारखंडचा रहिवासी असलेला अनिल रामलाल वर्मा (२३, रा. सिंहस्थनगर) करत होता. पोलीस उपआयुक्त श्रीकांत ढीवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बर्डेकर गोपनीय शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, दत्तात्रय विसे, अनिल दिघोळे, शंकर काळे आदिंनी अनिलला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता मुंबई नाका परिसरातील एका मित्राच्या घरी त्याने बॅटऱ्या लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून सुमारे २७ बॅटऱ्या हस्तगत केल्या. याप्रकरणी अधिक तपास विसे करीत असून, संशयिताच्या मित्रावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. वर्मा यास अंबड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. (वार्ताहर)
दोन लाखांच्या बॅटऱ्या हस्तगत
By admin | Published: February 18, 2016 11:21 PM