सिन्नर : आडवाडी-सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटात वळणावर ब्रेक फेल झाल्याने दूध वाहतूक करणारा छोटा हत्ती सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. त्यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी (दि.१४) सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.महानुभाव पंथाचे कुमारमुनी गुरु नरेंद्रमुनी अंकुळनेरकर (७६, मूळ रा. श्रीदेवदत्त महानुभाव आश्रम, वेरुळ लेणी. ह. मु. आडवाडी, ता. सिन्नर) यांचा या अपघातात मृत्यू झाला असून विठ्ठल बिन्नर (५५) नामक व्यक्तीसह चालक जखमी झाला आहे. तथापि, अपघातानंतर चालक पोलिसांसमोर आलेला नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी, हा छोटा हत्ती आडवाडी येथून सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटाने सिन्नरकडे दूध वाहून नेत होता. या घाटात तीव्र उतार आहे. एका वळणावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने छोटा हत्ती थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आडवाडी येथील पोलिस पाटील गुलाब बिन्नर यांना अपघाताची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना खबर दिली.ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करीत जखमींना रुग्णवाहिकेतून कुमारमुनी गुरु नरेंद्रमुनी अंकुळनेरकर, विठ्ठल बिन्नर यांना उपचारांसाठी दवाखान्यात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान, अंकुळनेरकर यांचा मृत्यू झाला. बिन्नर यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एच. ए. गोसावी पुढील तपास करीत आहेत.
गाडी दीडशे फूट खोल दरीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 9:00 PM
सिन्नर : आडवाडी-सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटात वळणावर ब्रेक फेल झाल्याने दूध वाहतूक करणारा छोटा हत्ती सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. त्यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी (दि.१४) सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
ठळक मुद्देआडवाडी-सोनांबे रस्ता: महानुभाव पंथाचे अंकुळनेकरबाबांचा मृत्यू