नाशिक : गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे फुलबाजारालाही त्याचा फटका बसला असून फुलांची आवक असली तरी मागणीमात्र फारसी नसल्याने त्याचा दरावर परिणाम झाला. झेंडूचे कॅरेट अवघे १०० ते १५० रुपयांना विकले गेले, तर गुलछडीला १०० रुपये किलोचा दर असल्याचे येथील फुलविक्रेत्यांनी सांगितले.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी झेंडूचे कॅरेट ३०० ते ४०० रुपयांपर्यंत विकले जाते. कोरोनामुळे दुकाने बंद, विवाहसोहळ्यांवर मर्यादा, गढीपाडव्याच्या पूजा, मुहूर्ताचे उत्सव नाही आणि नागरिकही घराबाहेर निघण्यास घाबरत असल्याने याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला. गुढीपाडव्याला झेंडूच्या फुलांसह इतर फुलांनाही मोठी मागणी असते.
मात्र, यावेळी फुलांची मागणी घटल्याचे दिसून आले. इतरवेळी ५० रुपयांना विकला जाणारा लिलीचा बंडल अवघा दहा रुपयांना तर गुलाबाचा बारा फुलांचा बंडत १० ते १५ रुपये इतक्या कमी किमतीत विकला गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गजऱ्यांची मागणी घटलीगुढीपाडवा आणि विवाह सोहळ्याप्रसंगी गजऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. विवाह सोहळ्यात तर २०० ते ३०० गजरे एका वेळी विकले जातात. यावर्षी मात्र विवाहसोहळ्यांवर बंधने असल्याने गजऱ्यांबरोबरच सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.कोरोनामुळे दुकाने बंद आहेत, शिवाय मुहूर्ताच्या पूजाही नसल्याने यावर्षी फुलांची मागणी खूपच घटली आहे. बाजारात फुलांची असलेली आवक आहे. त्या ग्राहकांना पुरेसी असल्यामुळे फुलांची टंचाई भासली नाही. मात्र, दर फारसे वाढले नाहीत-कृष्णकुमार गायकवाड, फुलविक्रेता, नाशिक