नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे. विशेषत: जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या निवारा केंद्रांत एका स्थलांतरित कामगाराला कोरोनाची लागण झाल्याने महापालिका विशेष काळजी घेत आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मजूर आणि कामगारांची अडचण झाली होती. विशेषत: जिल्हा बंदी आणि राज्य बंदी करण्यात आल्यानंतर अशा मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून शहरातील ६ विभागांतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण १८ निवाराकेंद्र तसेच राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत तीन केंद्र असे एकूण २१ निवाराकेंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मोलमजुरी करणारे कामगार, बेघर, प्रवासी अशा व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी पाणी, वीज, स्वच्छतागृह व आरोग्य विषयकसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. एकूण १४ निवाराकेंद्रांत महाराष्ट्रासह विविध राज्यातील मोलमजुरी करणारे कामगार व बेघर असे एकूण ७०१ व्यक्ती दाखल झालेले आहेत. तसेच दिशा फाउंडेशन व मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थामार्फत निवारा केंद्रातील व्यक्तींची मानसिकता सकारात्मक करणे, सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी यासाठी योग, प्राणायाम आणि मानसशास्त्रीय मार्गदर्शन आणि समुपदेशन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी सामायिक अंतर सोशल डिस्टन्स्ािंग पाळण्याची काटेकोर दक्षता घेतली जात आहे. पोलीस विभागामार्फत आवश्यकतेनुसार निवारा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्तही पुरविण्यात आलेला आहे, अशी माहिती उपायुक्त (समाजकल्याण) तथा प्रभारी शिक्षणाधिकारी अर्चना जाधव-तांबे यांनी दिली.महानगरातील या सर्व निवारा केंद्रांमध्ये दक्षता घेतलीजात असल्याने निराश्रित कामगारांकडूनदेखील या उपाययोजनांना चांगला प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळेच कोरोनाच्या विरुद्धची लढाई जिंकणे शक्य होणार आहे.निवारा केंद्रातील दाखल व्यक्तींची महानगरपालिका आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत नियमितपणे दररोज आरोग्य तपासणी करण्यात येते. निवारा केंद्राच्या परिसरात वेळोवेळी औषध फवारणी व स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात आहे. विशेषत: कोणाला संसर्ग होऊ नये, याबाबत काटेकोर काळजी घेतली जात आहे.
मनपा निवारा केंद्रांत सोशल डिन्स्टन्सिंंगची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:10 PM
लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे.
ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी उपाय : एकूण ७०१ नागरिकांना आधार; शहरात २१ केंद्रांमध्ये सोय