येवला : शहर व तालुक्यातील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अभिनव संस्थेच्या माध्यमातून १४ दिवसांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या श्रीकृष्ण कॉलनी येथील कार्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अनिल पटेल व नितीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. करिअरच्या अनेक संधी मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना नेहमीच हुलकावणी देत असतात. तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आधुनिक शिक्षणाची कास धरावी लागेल. नुसत्या जास्त टक्केवारी असलेल्या पदव्या करिअर घडवू शकत नाही. त्यासाठी टक्केवारीबरोबर देशपातळीवर कार्यरत असणारे इन्स्टिट्यूट व तेथे असणारी स्पर्धा लक्षात घेता जे.ई.ई. व नीट परीक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अमित पटेल व मयूरेश पटेल यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेत सुटीच्या काळात विद्यार्थी व पालकांना अकरावी, बारावी व त्यापुढील स्पर्धात्मक परीक्षांसाठी या विषयाचे तज्ज्ञ अलोक पाठक, एम. एस. वर्मा, संतोष यादव, सुजित तिवारी, मनोज दिंडे तसेच कमलाकर गायकवाड यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.
येवल्यात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:11 AM