नाशिक : पथकरनाके रद्द करावे तसेच अन्य मागण्यांसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विविध ठिकाणी मालमोटारी अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वाहने अडविणाऱ्या सुमारे दीडशे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तीन तासानंतर सोडून दिले. हे आंदोलन बेमुदत सुरूच राहणार असून, त्यामुळे औद्योगिक आणि अन्य जीवनावश्यक माल वाहतुकीवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे.टोल भरण्यास मालवाहतूकदारांचा विरोध नाही. मात्र, पथकर नाक्यांच्या अडथळ्यांना विरोध आहे. तास न तास एकाच ठिकाणी वाहने थांबवावी लागत असल्याने खोळंबा होतो. तसेच वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असल्याने हे आंदोलन होत आहे. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉँग्रेसच्या आवाहनानुसार हे आंदोलन देशभरात करण्यात आले. नाशिकमध्ये स्थानिक मालवाहतूकदार संघटनेने हे आंदोलन केले. नाशिकमध्ये साडेसहाशे मालवाहतूकदार असून, त्यांच्या मालकीच्या सुमारे बारा हजार ट्रक, टेम्पो बंद ठेवण्यात आले होते. सकाळी विल्होळी, शिंदे-पळसे, आडगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर अशा विविध ठिकाणी मालमोटारी अडवून त्यांना टोलनाक्यांच्या समस्येमुळे वाहतुकीत येणारा व्यत्यय, पेट्रोलचा अवास्तव खर्च अशा अनेक बाबी मांडण्यात आल्या. गांधीगिरी पद्धतीने हात जोडून हे आंदोलन करण्यात आले असले तरी त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. तीन तासानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष अंजू सिंघल, विलास चव्हाणके, संजय राठी, जयपाल शर्मा, राजेंद्र फड, शेख रईस, अजय सिंग, विनोद शर्मा यांच्यासह अन्य व्यावसायिक सहभागी होते. (प्रतिनिधी)
मालवाहतूकदारांचा चक्काजाम सुरू
By admin | Published: October 01, 2015 10:54 PM