नाशिक : बाजार समितीत टोमॅटो, वांगी, कारली, ढोबळी मिरची तसेच भोपळा यासह इतर फळभाज्या विक्रीला दाखल होत असल्या तरी त्या खरेदीसाठी मात्र ग्राहकांना हात गाडीवर दाम दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फळभाज्या खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटो मालाचे दर शंभर रुपये किलोपर्यंत असून आता कारले, वांगी, ढोबळी मिरची तसेच काकडी मालाला प्रति किलो ५० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई व मुंबई उपनगरात फळभाज्या माल रवाना केला जातो. महागलेला सर्वच फळभाज्या माल नाशिकहून मुंबईला पाठविला तरी त्या मालाचे पैसे होतील याची हमी नसल्याने बाजार समितील काही व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात माल खरेदी करणे सुरू केले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या वांगी ४५० रुपये प्रति (१५ किलो जाळी), भोपळा (१८ नग) ६०० रुपये, कारले (१५ किलो जाळी) ४५० रुपये तर ढोबळी मिरची (१२ किलो) ८०० रुपये दर मिळत आहे. टोमॅटो दर टिकून असून बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलो प्रति जाळीला १,८०० ते २,००० रुपये बाजारभाव टिकून आहे. सर्वसामान्य ग्राहकांना रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला घेण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतात. हातगाडीवर कोणत्याही फळभाज्या खरेदीसाठी ग्राहकांना पावशेर भाजीसाठी किमान २० रुपये मोजावे लागतात.