नाशिक : सर्पांची जुळण दिसली की कोणी म्हणतं, आणा लाल किंवा पांढरे कापड अन् फेका त्यांच्या अंगावर.. काय तर म्हणे धनलाभ होईल अन् हे शुभ ठरेल; मात्र ही निव्वळ अंधश्रध्दा होय. असेच काहीसे वाक्य हनुमानवाडी परिसरातील धामण जातीच्या सर्पांची जुळण बघणाऱ्यांमधूनही कानी पडत होते. सर्पांची ही झुंज बघून अनेकजण थक्क झाले! सध्या उन्हाळा तापला असून, हा काळ सर्पांच्या विविध प्रजातींचा प्रणयाचा मानला जातो. सर्प हा असा एकमेव सरपटणारा प्राणी आहे, की त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. त्यामुळे प्रणयाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ज्या भागात मादी वास्तव्यास असते तेथे नैसर्गिकरीत्या ती एक प्रकारचा गंध वातावरणात सोडते. हा गंध त्या परिसरात असलेल्या नर जातीच्या सर्पांना आकर्षित करतो. अशावेळी त्या भागात एकापेक्षा अधिक नर जातीचे सर्प असल्यास त्यांच्यात मादीचे स्थान मिळविण्यासाठी नैसर्गिकरीत्या झुंज सुरू होते. ही झुंज म्हणजेच जुळण नागरिकांना नजरेस पडते. हनुमानवाडी भागात अशाच प्रकारे थक्क करणारी धामणची झुंज बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नैसर्गिक नाल्याच्या काठावर, गवताळ भागात, तलावाजवळ, कालव्यालगत किंवा अडगळीच्या ठिकाणी अशा प्रकारची जुळण नजरेस पडते. हनुमानवाडी भागात धामणची जुळण दिसताच नागरिकांची नाल्याच्या भिंतीवर गर्दी जमली. काही लोक नाल्याच्या पात्रात उतरून सर्पांचे चित्रीकरण करत होते, तर काही त्यांच्या अंगावर पांढरा किंवा लाल कापड आणून फेकण्याच्या तयारीत होते.
सर्पांच्या प्रणयपूर्व झुंजीने नागरिक थक्क !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:13 AM