एटीएमसमोर लागल्या रांगा
नाशिक : गेल्या चार दिवसांपासून बँका बंद असल्याने शहरातील काही एटीएम केंद्रांमध्ये ग्राहकांच्या रांगा दिसत आहे. काही एटीएममधील कॅशदेखील संपुष्टात आल्यामुळे ग्राहकांना एटीएमची शोधाशोध करावी लागली. मशिन्समधून येणाऱ्या कागदी स्लिपचा कचरादेखील केंद्रांमध्ये साचलेला दिसतो.
ताक, लस्सीची दुकाने सुरू
नाशिक : उन्हाची तीव्रता वाढताच शहरात अनेक ठिकाणी ताक आणि लस्सीची दुकाने सुरू झाली आहेत. उन्हामुळे थंड पेयांना मागणी वाढत असते. विशेषत: ताक, मठ्ठा तसेच लस्सीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दरवर्षी अशाप्रकारची अनेक दुकाने शहर परिरसरात दिसून येतात.
खेाडदेनगरला रस्त्याचे खोदकाम
नाशिक : टाकळी येथील खोडदेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणताही फलक न लावता खोदकाम करण्यात येत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सकाळी अनेक लोक या मार्गाने ये-जा करतात. मात्र अचानक रस्त्यावर खोदकाम सुरू झाल्याने त्यांना वळसा घालून जावे लागले. कामाच्या ठिकाणी फलक नसल्याने वाहनधारकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे.
जेलरोडला रस्त्यावर पाइप पडून
नाशिक : जेलरोड येथे जलवाहिनीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये अजूनही पाइप टाकण्यात आलेले नाहीत. हे पाइप रस्त्याच्या कडेला पडून असल्याने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा होत आहे. खड्ड्यांमुळे मातीदेखील रस्त्यावर पसरली आहे.
मोरे मळ्यात डासांचा उच्छाद
नाशिक : जेलरोड येथील मोरे मळा परिसरात मेाठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या डासांमुळे लहान मुले आजारी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या परिरसरात धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे.