नाशिक : शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीचे पात्र दुपारीच ओसंडून वाहू लागले. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेली काही वाहने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. मात्र, नदीकाठावरील कार्यकर्त्यांनी हिंमतीने त्यातील अनेक कार वाहून जाण्यापासून वाचविल्या.शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असले तरी तुफान पाऊस कोसळण्याचा अंदाज नव्हता. त्यामुळे गोदाकाठावर नियमितपणे पार्किंगला लावलेल्या वाहनांपैकी काही वाहने पाण्याच्या प्रवाहात येऊ लागले. वाहनमालकांच्या आणि परिसरातील युवा कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यातील तरबेजपणे पोहता येणाऱ्या काही युवकांनी या वाहनांना पाण्याच्या प्रवाहातून उलट दिशेला ओढून नेत सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे काठावरील अनेक वाहने वाचू शकले. त्याआधी पाऊस वाढू लागल्याचे दिसताच काठावरील टपरीचालक आणि दुकानदारांनी दुपारीच आवरासावर करून घेण्यास प्रारंभ केला होता. पहिल्याच पावसात नदीपात्रातील पाणी इतके वाढेल, अशी अपेक्षा नसल्याने काही दुकानदार पाणी उतरण्याची वाट बघत होते. मात्र, दुपारी दोनपर्यंतच अगदी काठावर असलेल्या टपऱ्यांमध्ये पाणी शिरू लागल्यावर दुकानदारांनी जागांमधून सामान सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे किरकोळ नुकसान वगळता दुकानदारांचेही फारसे नुकसान झाले नाही.