नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांसाठी कार्टून दाखविणार असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण, नाशिक महापालिका आता मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे, लवकर विषय समजावा, अवघड अभ्यासाची सोप्या पद्धतीने उकल व्हावी म्हणून डिजिटल पद्धतीने शिक्षण देणार आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने अत्याधुनिक शिक्षणाच्या दिशेने पाऊल उचलले असून, पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत काही शाळांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. मनपाच्या ८२ शाळांच्या ६५६ वर्गखोल्या डिजिटल करण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान हे आजच्या युगात खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीत आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. तंत्रज्ञानामुळे आपले रोजचे जीवन खूप सोपे व जलद केले आहे. त्यामुळे आपली सर्व कामे काही मिनिटात पूर्ण होतात. हाच निकष पकडून स्मार्ट सिटी अंतर्गत दिल्लीच्या पॅराडियम कंपनीच्यावतीने महापालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग खोल्या करण्यात येणार आहे. मुलांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी बेंचेस, आकर्षक दरवाजे, ट्यूबलाइट वगैरे सारख्या अनेक नववस्तूंनी ही डिजिटल रूम सजविण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांच्या आकर्षणात अधिकच भर पडणार आहे.
काय राहणार डिजिटल रूममध्ये
इंटरॅक्टिव्ह पॅनल ७५ इंचव्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेराडिजिटल कंटेट२० संगणकांची लॅबप्रिंटरवातानुकुलिन नियंत्रणट्यूबलाइटआकर्षक रंगरंगोटीकार्टूनच्या बेंचेससुरक्षेसाठी सीसीटीव्हीवीज गेल्यास बॅटरी बॅकअपसहपॉवर सेवर
मुलांच्या गैरहजेरीचा पालकांना मिळणार अलर्टपहिली ते आठवीच्या मुलांसाठी हे डिजिटल शिक्षण असून, त्या स्क्रीनवर प्रत्येक विषयाचे क्रमिक पुस्तक डिजिटल स्वरूपात दिसणार आहे. मुलांना व्हिडीओवरून अभ्यास करणे सोपे होणार आहे. मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे याबाबत पालकांनाही समजणार असून, पालकांना स्वतंत्र ॲप दिले जाणार आहे. मुले गैरहजर राहिल्यास तसा अलर्ट पालकांच्या मोबाइलवरही मिळणार आहे.
खासगी शाळांमध्ये पालकांना अव्वाच्या सव्वा फी भरावी लागते. गरिबांना ते शिक्षण परवडणारे नाही. त्या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे असा आमचा हेतू आहे. महापालिका शिक्षण मंडळातील ८३६ शिक्षकांना या स्मार्ट स्कूलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुळात शिक्षकही डिजिटल व्हावेत अशीही आमची इच्छा आहे. -बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका
स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअरहे वेगळे सॉफ्टवेअरही दिल्लीच्या कंपनीमार्फत तयार केले जात आहे. यात शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीचीही दखल घेतली जाणार आहे. शाळेतील शिक्षकांचा परफॉर्मन्स, त्यांची शिकविण्याची पद्धत याचीही माहिती सदर सॉफ्टवेअरद्वारे मिळणार आहे.