नाशिक : सह्याद्री पर्वतरांगेतील ब्रह्मगिरीसह परिसरातील अवैध उत्खननप्रकरणी सुरू असलेला लढा विविध पातळीवर सुरू आहे. सोशल मीडियावर तर मोठी चळवळ सक्रिय झाली असून, या मोहिमेतून जनमत तयार करण्याबरोबरच प्रशासकीय भूमिकेवरही परखडपणे भाष्य केले जात आहे. याच मोहिमेत सध्या एका कार्टूनची जोरदार चर्चा होत आहे. या कार्टूनच्या माध्यमातून महसूल यंत्रणेतील कारभारावर थेट टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. शिवाय कार्टूनपात्रांवरील हा संवाद कुणासंदर्भात असावा याबाबतची खमंग चर्चाही दिवसभर सुरू होती.
सह्याद्रीच्या वेदना अगदी मुंबई ते दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात आलेल्या आहेत. शासकीय तसेच प्रशासकीय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चळवळ अधिक गतिमान करण्यास हातभार लागला आहे. ‘ब्रम्हगिरी मी, सह्याद्री मी’ या माध्यमातून सोशल मीडियावर अवैध उत्खनन प्रकरणी परखपणे मते मांडली जात आहेत. कधी प्रशासकीय कारभारावर तर कधी मोहिमेतील चुकांवरही बोट ठेवले जाते. सध्या एक कार्टून आणि ‘मुळशी पॅटर्न’मधील संवादाची पॅरोडी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील या चित्रांच्या माध्यमातून थेट महसूल यंत्रणेवरील इच्छाशक्तीवरच बाण सोडण्यात आले आहेत. उत्खनन प्रकरणी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असल्याचे आणि कारवाईची टेालवाटालवी केली जात असल्याची बाब कार्टूनच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर झालेली दिरंगाई, त्यानंतर स्थापन झालेली दुसरी समिती आणि नव्या समितीची बैठक झाल्याच्या औचित्यावर हे कार्टून आल्याने पर्यावरण प्रेमींनी संंबधिताकडे सुचक इशाराच केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कार्टूनमधून शेरेबाजी करण्यात आली असली तरी मुळशी पॅटर्न टाईप इशाराही देण्यात आला आहे. राखीव वनक्षेत्रात कुणाच्या आशीर्वादाने कामे सुरू आहेत आणि कुणी त्यास पाठीशी घालत असेल तर त्यांच्या नोकऱ्या खाणार, असा स्पष्ट इशारा देत यंत्रणेवर गंभीर स्वरपूचा संशयच व्यक्त करण्यात आला आहे.
या दोन्ही चित्रांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. महसूल विभागातील अनेक ग्रुपवरही ही चित्रे व्हायरल झाल्याची चर्चा आहे.