महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम विनापरवाना साजरा करून गर्दी जमविल्याने अंबड पोलीस ठाण्यात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मनसेचे पदाधिकारी नितीन माळी, देवचंद केदारे, अर्जुन वेताळ, ललित वाघ, संदेश जगताप ( सर्व रा.सिडको) यांच्यासह १० ते १५ कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सिडकोतील साईबाबा मंदिर येथे ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त विनापरवानगी आरोग्य शिबिर घेत गर्दी जमवली होती. त्यामुळे त्यांच्यावर जमावबंदीचे उल्लंघन करून कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर येथे देखील मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शहरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम अन्वये गर्दी करु नये याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मनाई आदेश जारी केला आहे. असे असतानाही मनसेचे सातपूर विभागीय अध्यक्ष योगेश उर्फ बंटी लभडे (रा. सातपूर कॉलनी) यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत विनामास्क व सुरक्षित अंतर न ठेवता दि.१४ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सातपूर पोलिसांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मंगळवारी शिवसेनेचे सिडको विभाग प्रमुखाने आपल्या वाढदिवशी पेलिकन पार्क येथे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुयश पाटील यांच्यासह शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे, निखिल मेहंदळे, एकनाथ शिंदे व इतर दहा ते पंधरा जणांनी वाढदिवस साजरा केला, म्हणून अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.