संजय पाठक / नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणाची आता चौकशी होणार असून, त्यामुळे चौकशीत कोणी तरी दाेषी ठरणार हे उघड आहे. चौकशी प्रकरण कोणावर तरी शेकणार हे उघड असले तरी यामुळे महापालिकेतील ठेकेदारी आणि त्यांच्याशी अधिकारी तसेच राजकीय नेते आणि नगरसेवकांची संगनमताचे संबंध उघड होतील काय हा खरा प्रश्न आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) दुर्घटना घडली. महापालिकेचे हे जुन्या नाशकातील रुग्णालय गोरगरीब आणि सामान्य रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी याठिकाणी अत्यंत कष्टाने सेवा बजावत आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन टाकी असून, त्यातील गॅस रिफील करताना पाइप लाइनचा व्हॉल्व्ह तुटल्याने ऑक्सिजनची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाइप तुटणे हा तत्कालीन अपघात असला तरी, तो कसा घडला यावरदेखील प्रकाश पाडूुन जबाबदारी निश्चित होणे आलेच. रस्त्यात एखादा अपघात अचानक घडला तरी शेवटी त्यात कोणावर तरी जबाबदारी निश्चित होतेच. अगदी दुचाकीस्वार घसरून पडला तरी संबंधित चालकावर गुन्हा दाखल होतो, येथे तर तब्बल २४ जणांचे प्राण गेले आहेत.महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी बसविण्याच्या टाकीवरून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे एकतर दहा वर्षांसाठी ऑक्सिजन टाकी भाड्याने घेण्याचा प्रकारच संशयास्पद होता. महापालिका २५-५० लाख रुपयांची टाकी सहज घेऊ शकत होती, परंतु तरीही दहा वर्षांसाठी भाड्याने टाकी घेण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत भाड्याने टाकी घेण्यास विरोध करण्यात आला होता. दहा वर्षे ऑक्सिजन टाकी भाड्याने घेण्याची गरज आहे काय, कोराेनाची तीव्रता कमी झाल्यानंतर या टाकीची काय उपयाेग शिवाय दहा वर्षांनंतर ही टाकी संबंधित ठेकेदार कंपनी काढून नेणार त्यामुळे उपयोग काय होणार? असा प्रश्न स्थायी समितीने उपस्थित केला हाते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने ठेका पुढे रेटला.
ठेका देण्यातही एकवेळ गैर नाही. मात्र टाकीचे संचलन, देखभाल दुरुस्तीची जबाबदारीदेखील संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आली असून, याच ठिकाणी ठेकेदार कंपनी अडकली आहे. ३१ मार्च रोजी बसवलेल्या ऑक्सिजन टाकीचा नोझल अवघ्या २१ दिवसांत तुटतोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंपनीचे नाशिकमध्ये कार्यालय नाही की तंत्रज्ञांचे पथक मग अशी सक्ती निविदेत का नव्हती? असादेखील प्रश्न उपस्थित झाला आहे.आता चाैकशीत ठेकेदार कदाचित सापडेल, परंतु ज्यांनी निविदा काढण्याच आग्रह धरला आणि त्यातही महापालिकेच्या आणि पर्यायाने रुग्णालयाच्या हिताच्या अटी-शर्ती टाकल्या नाहीत त्या ठेकेदार स्नेही अधिकाऱ्यांचे काय करायचे? असा खरा प्रश्न आहे. चौकशीचे हात अशा झारीतील शुक्राचार्यपर्यंत पोहोचला तरच उपयोग आहे.