पंचवटी : मुंबईहून लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेला स्टेजवर फोटो काढणे चांगलेच महागात पडले आहे. फोटो काढताना हातातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग स्टेजवर काढून ठेवल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सदर महिलेची नजर चुकवून बॅग लंपास केल्याची घटना आडगाव शिवारातील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे घडली आहे.या घटनेबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील चेंबूर येथे राहणाऱ्या प्रशांत गोविंद भामरे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भामरे व त्यांची बहीण विद्या गोरक्ष भांडारकर असे नाशिकला पंचवटीत आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे लग्नसोहळ्यासाठी रविवारी आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास भांडारकर व अन्य कुटुंबातील मंडळी लग्नसोहळ्यात स्टेजवर फोटो काढण्यासाठी गेले त्यावेळेस भांडारकर यांनी त्यांच्या हातातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असलेली बॅग स्टेजवर ठेवली त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. काही वेळाने चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास येताच भामरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरी झाल्याची तक्र ार नोंदवली. सदर बॅगेत सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम तसेच ५० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेले होते, असे पोलिसांनी सांगितले.
दागिन्यांसह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:40 AM