सिडको : राणा प्रताप चौक येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून लाखो रुपयांची घरफोडी करून पलायन केले. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील छगनराव भोजने घरी नसताना त्यांचे कुटुंबीय झोपण्यासाठी वरच्या मजल्यावर जात असल्याने मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी खालच्या मजल्यावर कोणीही नसल्याने घर बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे तीस ते पस्तीस तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने व ५७ हजार रुपयांची रोकड मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. चोरट्यांनी जाताना गणेश चौक भागात सोन्याचे दागिने काढून घेत रिकामे बॉक्स टाकून पोबारा केला. सकाळी भोजने यांचा मुलगा दीपक भोजने खाली आल्यानंतर त्याला घराची खिडकी उघडी दिसली तसेच घराचे कुलूपही तुटलेले दिसले. त्यामुळे चोरी झाल्याचा संशय आल्याने दीपकने घरात पाहिले. या वेळी कपाटातील सोन्या, चांदीचे दागिने व रोकड चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात या घटनेविषयी तक्रार दाखल केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत श्वानपथकालाही पाचारण केले. मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिडकोत ३० ते ३५ तोळे सोन्यासह रोकडची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:19 AM