नाशिक : महाराष्ट्र सध्या ज्वलंत वातावरणातून जात असताना जातीय व्यवस्थेविषयी जागृती होणे अपेक्षित असून, समाजविकासासाठी जातिनिर्मूलन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. हरी नरके यांनी के ले.बौद्ध साहित्य मंडळातर्फे कालिदास कलामंदिर येथे धम्मचक्र प्रवर्तन हीरकमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘जातिनिर्मूलन आजच्या काळाची गरज’ विषयावर डॉ. हरी नरके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बौैद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष अतुल भोसेकर, भारत तेजाळे, रवि पगारे, पद्माकर भालेराव उपस्थित होते. नरके म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या जाती निर्मूलनविषयक विचारांचे अनुकरण करणाऱ्यांची संख्या अल्प प्रमाणात आहे. सध्या समाजातील दोन नेते एकत्र आले तर तीन पक्ष तयार होतात. ही स्थिती जातीय व्यवस्थेमुळेच असल्याचे सांगताना त्यांनी आजच्या स्थितीत जातिनिर्मूलनासाठी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या शिक्षण, ज्ञाननिर्मिती, स्त्रियांना समान अधिकार, संपत्तीच्या स्रोतांचे पुनर्वाटप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंतरजातीय विवाह व चिकित्सात्मक दृष्टिकोन मार्गावर पुढे जाण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारतीय समाज व्यवस्थेत उत्पन्नाच्या स्रोतांचे जातीनिहाय वाटप झाले असल्याने ज्यांचे उत्पन्न घटले त्यांना ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणे आवश्यक असून, त्यांना जातीनिर्मूलनाच्या प्रवाहात सामील करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पुणे येथील काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘अनहिलेशन आॅफ कास्ट’ भाषणाचे नाट्य अभिवाचन केले. (प्रतिनिधी)
समाजविकासासाठी व्हावे जातिनिर्मूलन
By admin | Published: October 17, 2016 12:24 AM