सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बेलू शिवारात मादी बछड्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. बेलू येथील बेंद मळ्यात मधुकर त्र्यंबक तुपे यांच्या गट नंबर ३५३ मधील विहिरीवर सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही शेतमजूर पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विहिरीत बछडा पडल्याचे दिसून आली. त्यांनी सदर माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिल्यावर उत्तम तुपे, अमोल तुपे, दीपक तुपे, हरिश्चंद्र तुपे, पिंटू वाजे, दीपक वाजे यांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, ६० फूट खोल विहिरीत ४० फूट पाणी असल्याने बछड्याला वाचवणे सोपे नव्हते. घटनेची माहिती वनविभागाला तातडीने कळविण्यात आली. विहिरीपासून वस्ती दूर असल्याने बाज व दोरी आणण्यात बराच वेळ गेला. तोपर्यंत बछडा पूर्णपणे थकलेला दिसत होता. पहिल्या प्रयत्नात बाज विहिरीत सोडल्यानंतर दोर निसटल्याने त्याला वर काढून जीव वाचविण्याचा प्रयत्न फसला. बाज विहिरीबाहेर काढून पुन्हा दोर बांधावे लागले. दुसऱ्यांदा बाज विहिरीत सोडली तेव्हा खूपच उशीर झाला होता. अखेर ग्रामस्थांनी बिबट्या विहिरीच्या बाहेर काढला. पशुपर्यवेक्षक डॉ. विश्वास वल्टे यांनी त्यास मृत घोषित केले. वनपरिमंडळ अधिकारी आगळे यांनी घटनेचा पंचनामा केला.
बेलू शिवारात विहिरीत पडून बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 4:34 PM