नाशिक : अभयारण्यात विनापरवाना प्रवेश करणे वन्यजीव कायद्याने गुन्हा ठरतो. तरीदेखील वन्यजीवांच्या शिकारीसाठी अभयारण्य क्षेत्रात काही शिकऱ्यांकडून घूसखोरी केली जाते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या राजूर वनक्षेत्रात रानडुकरांची शिकार करणाऱ्या एका संशयिताला नाशिक वन्यजीव विभागाच्या राजूर-भंडारदरा पथकाने ताब्यात घेतले आहे. हा शिकारी आंतरराज्यीय टोळीतील गुन्हेगार असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर वनक्षेत्रात सोमलवाडी शिवारात रानडुकरांची बंदुकीने शिकार करण्यात आल्याची माहीती वनाधिकाऱ्यांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी तात्काळ राजूर वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे, अमोल आडे यांची दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करून शिकाऱ्यांच्या मागावर धाडली. पथकांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरवून मौजे गंभीरवाडी (सोमलवाडी) येथील एका संशयित आरोपीचा माग काढला व त्यास अटक केली. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम- १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत स्थानिक संशयित शिकाऱ्याच्या घराची वन्यजीव विभागाच्या पथकाने झडती घेतली असता घरातून अल्युमिनिअमच्या भांड्यात दडवून ठेवलेले रानडुकराचे मांस तसेच पाच जाळे, पाच वाघूर, दोन धारधार कोयते, वाघूर लावण्याच्या काठ्या, बॅटरी, लाकडी ठोकळा असे शिकारीसाठी लागणारे साहित्य आढळून आले.
संशयितास अकोले तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची वनकोठडी न्यायाधीशांनी सुनावली. या कारवाईत वनपाल शंकर लांडे, रवींद्र सोनार, राजेंद्र चव्हाण, सचिन धिंदळे, भास्कर मुठे, वनरक्षक विनोद कोळी, ज्योत्स्ना बेद्रे आदींनी सहभाग घेतला.
------इन्फो-----
रायगड, ठाण्यातील शिकाऱ्यांची टोळी
अभयारण्यात रानडुकरांच्या शिकारीत रायगड व ठाणे जिल्ह्यातील शिकाऱ्यांची आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीतील चार संशयितांचा ठावठिकाणा लागला असून पथक त्यांच्या मागावर असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले. लवकर त्यांनाही ताब्यात घेण्यास यश येणार असून वन्यजीव शिकारीच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संशयित आरोपींना या गुन्ह्यात ३ ते ७ वर्षांचा कारावास व २५ हजार रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. जप्त केलेले मांस पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
---
फोटो nsk वर मेल केलेला आहे