नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार सुरू असतानाही अवघ्या दोन ते तीन दिवसांतच रुग्णांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात सातत्याने होत असलेली वाढ पाहता, या मृत्यूंचे खरे वैद्यकीय कारणांची मिमांसा करण्यास आरोग्य खात्याने चालढकल चालविल्याचे वृत्त आहे. काेरोना होऊन घरीच मृत्यू पडलेल्यांच्या प्रमाणापेक्षा रुग्णालयात दाखल होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेतील यातील काही दोष समोर येऊ नये म्हणूनच तीन महिने उलटूनही या गंभीर प्रश्नावर प्रशासकीय व आरोग्याच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर स्वरूप घेऊन आली होती. या लाटेत सुमारे सहा हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य व्यवस्थेची परीक्षा पाहणाऱ्या या लाटेत वाढलेले मृत्यूचे प्रमाण पाहता, त्याची कारणमिमांसा करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मार्च महिन्याच्या काळातच दिल्या होत्या. त्यात प्रामुख्याने प्रशासकीय लेखापरीक्षण व आरोग्य विषयक लेखापरीक्षण केले जावे जेणे करून कोरोनाने मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यू मागे नेमके काय कारण आहे हे समोर यावे व त्याच्या अनुभवावर झालेल्या त्रुटी दूर केल्या जाव्या असा हेतू होता. त्यासाठी प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल या शासकीय यंत्रणेच्या अधिपत्याखाली असलेल्या आरोग्य सेवेबरोबरच कोविड काळात उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना छापील फॉर्मही देण्यात आला होता. त्यात रुग्णांची सारी माहिती तर होतेच, परंतु रुग्ण कधी दाखल झाला, त्याचे आरटीपीसीआर चाचणी कधी केली, त्याचा स्कोर किती होता, उपचारानंतर हा स्कोर कमी झाला की वाढला, कोणत्या रुग्णालयातून त्याला रेफर करण्यात आले, अगोदरच्या रुग्णालयाने त्यावर काय उपचार केले? रुग्ण हायरिस्कचा होता की नाही, तो कोणाच्या संपर्कात आला होता. डॉक्टरांंनी त्याच्यावर काय काय उपचार केले, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर किती दिवस होता, त्याला कोणते औषधे दिली व त्याच्या मृत्यूचे कारण काय अशी बारिक चिकित्सा करणारी माहिती फाॅर्ममध्ये भरणे सक्तीचे करण्यात आले होते. काही रुग्णालयांनी ही माहिती भरून दिली परंतु बहुतांशी रुग्णांची माहिती सारखीच असल्याचे आढळून आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
चाैकट=====
अशी होती कारणे
* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढती संख्येच्या तुलनेत रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड नव्हते.
* रुग्णालयात ऐन वेळी बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांचा उपचाराविना मृत्यू झाला.
* ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकलेला नाही.
* रुग्णालयांनी त्यांच्या ऑक्सिजनच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला, परिणामी रुग्णांना ऑक्सिजन कमी पडले.
* व्हेंटिलेटर बेडची कमतरताही यानिमित्ताने पुढे आली.
* रुग्ण पूर्ण बरा होण्याऐवजी थोडा बरा झाला तरी त्याला व्हेंटिलेटरवरून हलवून अन्यत्र दाखल करण्यात आले.
* रेमडेसिवीर औषधांचा तुटवड्यामुळेही रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावले.
=======
चौकट==
अपयश झाकण्याचा प्रयत्न
कोरोनाने मृत्यू झाल्याची बाब खरी असली तरी, यातील बहुतांशी रुग्ण हे वैद्यकीय कारणांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढला जात असून, कोरोनाने मृत्यू झालेल्या प्रत्येकाची माहिती संकलित करून जिल्हा रुग्णालयाने व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक मृत्यू झालेल्या व्यक्तीवर काय उपचार झाले, त्याची प्रकृती कशी ढासळत गेली, वैद्यकीय उपचारात त्यात हलगर्जीपणा कोणत्या पातळीवर झाला याचा निष्कर्ष काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्येच सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंच्या कारण मिमांसा न करण्यावर भर दिला जात आहे.