अझहर शेख, नाशिक : कोणतीही पूजाविधी असो अथवा धार्मिक कार्य. त्यावेळी घरातील तसेच मंदिरातील वातावरण भक्तीमय करण्यासाठी अगरबत्ती जाळण्याची परंपरा मागील अनेक वर्ष जुनी आहेत. सुवासिक अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरण भक्तीमय होण्यास मदत होते; मात्र यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या चायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका उद्भवू शकतो. ही अगरबत्ती आरोग्यासाठी घातक ठरणारी असल्याचे बोलले जात आहे.‘श्रीं’चा उत्सव अर्थात गणेशोत्सवाला गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वूभमीवर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अबालवृध्दांकडून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण भक्तीमय करण्यासाठी फुले, धूप, अत्तर, अगरबत्तीचा वापर नागरिकांकडून केला जातो. मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अगरबत्तीची भुरळ सर्वसामन्यांना पडणे स्वभाविक आहे. कारण अगरबत्तीची लांबी सामान्य भारतीय अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक आहे. ही अगरबत्ती सुमारे पंधरा तासांपेक्षा अधिक वेळ जळते. तसेच या अगरबत्तीचे दरदेखील कमी आहे. त्यामुळे नागरिकांकडून या अगरबत्तीला पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चायनिज अगरबत्ती स्वस्त जरी असली तरी ती आरोग्यासाठी ‘महाग’ ठरु शकते. या अगरबत्तीचा धुराद्वारे येणारा सुगंध जीव गुदमरायला लावणारा असल्याचे काही भाविक सांगतात. शहरातील डॉक्टरांनीदेखील अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता वर्तविली आहे. आरोग्यहित लक्षात घेता या अगरबत्त्यांचा मोह आवरणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
अगरबत्तीच्या धुरामुळे निश्चित श्वसनतंत्रावर परिणाम होऊ शकतो. सुरूवातीला गिळायला त्रास होणे, आवाज घोगरा होणे अशी लक्षणे दिसतात.शरीराला धूर नकोसा वाटतो आणि जीव गुदमरायला लागतो तेव्हा मनुष्य त्या वातावरणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. कारण श्वसननलिकांमार्फत धूर थेट फुफ्फुसात जात असतो. यामुळे लहान श्वसननलिका आंकु चन पावतात. परिणामी प्राणवायूचा शरीराला पुरवठा कमी होऊ लागतो. यामुळे दीर्घकाळ आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. नागरिकांनी अगरबत्ती खरेदी करताना खबरदावी व सावधगिरी बाळगावी.