नाशिक : आपण खवय्ये असाल आणि चांगल्या रेस्टॉरंटच्या शोधात महागड्या चारचाकीने गंगापूररोडवर जाण्याचा बेत आखणार असाल किंवा आपल्या नातेवाईकांच्या विवाहसमारंभासाठी येथील लॉन्समध्ये हजेरी लावण्यासाठी जाणार असाल तर सावध रहा, अन् विशेष खबरदारी घ्या...कारण तुमचा हा बेत धोक्याचा ठरू शकतो. सध्या गंगापूररोड परिसर चोरट्यांच्या रडारवर असून विविध हॉटेलच्या बाहेर रस्त्यालगत उभ्या राहणा-या चारचाकींच्या काचा फोडून त्यामधील मौल्यवान वस्तू लंपास करण्यासा सपाटा चोरट्यांनी लावला आहे.शनिवारी मध्यरात्री बारा वाजेनंतर गंगापूररोड परिसरातील विविध हॉटेलच्या बाहेर उभ्या केलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी कारमधील सुमारे दोन लाखांचे दागिणे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गंगापूररोडवर सातत्याने कारफोडी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दर दिवसाआड गंगापूररोड भागात चोरट्यांकडून विविध लॉन्स किंवा हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या मोटारींना लक्ष्य केले जात आहे. विशेष म्हणजे अद्याप एकही चोरटा या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हाती लागलेला नाही.पुण्यातील कोंढवा येथून एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी नाशिकमधील गंगापूररोडवर आलेले नीलेशा अंबादास संगपाळ (३५) यांनी त्यांची मोटार (एमएच १५ एनबी ०१०६) एका खासगी लॉन्सच्या बाहेर उभी केली. यावेळी साडेदहा वाजेनंतर चोरट्यांनी कारचे लॉक असलेले दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र अपयशी झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मागील काच लोखंडी वस्तूच्या साहाय्याने फोडून कारमध्ये प्रवेश केला. सीटवर ठेवलेली लेदरची बॅग घेत चोरट्यांनी पोबारा केला. सदर बॅगमध्ये सोन्याचांदीचे दागिणे होते. संगपाळ जेव्हा परतीच्या प्रवासासाठी कारजवळ आले असता फुटलेली कार बघून त्यांना धक्का बसला आणि जेव्हा बॅग चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी त्वरित गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद दिली.दुसरी घटनेतही गंगापूररोडवरील याच ठिकाणी संगपाळ यांच्याच मोटारीच्या शेजारी उभाी असलेली मोटार फोडून दागिणे पळविले. चोरट्यांनी एमएच १५ जेझेड ४९९३ या क्रमांकाची कारची काच फोडून कारमधील दागिणे, कॅमेरा चोरून नेला. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, २५ग्रॅमची सोन्याची मोहनमाळ, ३०ग्रॅमचे सोन्याचा हार, सात ग्रॅमची ठुशी, दहा ग्रॅमची सोन्याची साखळी, कॅनन कंपनीचा तीस हजार रुपये किंमतीचा कॅमेरा असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद फिर्यादीनुसार पोलीसांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक वाघ करीत आहेत.
सावधान : नाशिकमधील गंगापूररोडवरवर जात असाल तर कारफोडीचा धोका टाळण्यासाठी रहा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:03 PM
शनिवारी मध्यरात्री बारा वाजेनंतर गंगापूररोड परिसरातील विविध हॉटेलच्या बाहेर उभ्या केलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी कारमधील सुमारे दोन लाखांचे दागिणे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देएकूण २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद चारचाकींच्या काचा फोडून त्यामधील मौल्यवान वस्तू लंपास करण्यासा सपाटा