त्र्यंबकेश्वर आणि प्रयागराज येथे झालेला कुंभमेळा ज्यांच्या अधिपत्याखाली पार पडला, त्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष व निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज हे सोमवारीसायंकाळी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आले. प्रयागराजवळील अल्लापूरमधील बाघंबरी गद्दी मठाच्या खोलीत फाशी घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. मात्र, नरेंद्रगिरी महाराज यांनी खरच आत्महत्या केली की, यामागे घातपात आहे, असा प्रश्न नाशिकमधील साधू-महंत उपस्थित करत आहेत. याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करून सत्य उजेडात आणावे आणि दोषींना कडक शासन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कोट..
महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या मृत्यूच्या रहस्यावरील पडदा उठण्यासाठी या प्रकरणाची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करावी. आखाडा परिषदेच्या अध्यक्षांची अशी स्थिती असेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. या घटनेतील दोषींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे, हीच महंत नरेंद्रगिरी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- भक्तीचरणदास महाराज,
महंत पंचमुख हनुमान मंदिर.
कोट...
महंत नरेंद्रगिरी महाराज ज्ञानी व्यक्तिमत्व होते. त्यामुळे ते आत्महत्या करूच शकत नाहीत. त्यांची हत्त्याच झालेली आहे. संपत्ती बळकावण्यासाठी ही हत्या झाली असावी, असा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ व्हायला हवे.
- रामस्नेहीदास महाराज, महंत लक्ष्मीनारायण मंदिर
कोट..
हे प्रकरण संशयास्पद आहे. यात काही अधिकारीदेखील सहभागी आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही. केंद्रीय यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा करावी.
- संजय दास महाराज,
उत्तराधिकारी महंत ग्यानदास महाराज
कोट...
महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण समाज दु:खी आहे. ही हत्या, की आत्महत्या याविषयी शंका व्यक्त होत आहेत. चौकशीमुळे यातील सत्य बाहेर येईल.
- राजेंद्रदास महाराज,
महंत निर्मोही आखाडा