लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डातर्फे ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेतही नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बारावीप्रमाणेच चांगले यश मिळवले असून, केंद्रीय विद्यालयासह नाशिकमधील बहुतांश शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.बारावीच्या निकालानंतर दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. शनिवारी विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावर जाऊन प्राप्त केला. सीबीएसईने बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता दहावीचा आॅनलाइन निकालही विद्यार्थ्यांच्या हाती आला आहे. आॅॅनलाइन निकालानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत गुणपत्रिका उपलब्ध होणार आहे. दहावी परीक्षेच्या निकालाबाबत झालेल्या सुधारणा धोरणाच्या वादामुळे यंदा बारावी सीबीएसईचा निकालही लांबणीवर गेला होता. अखेर शनिवारी निकाल हाती पडल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. देवळाली केंद्रीय विद्यालयसीबीएसई बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत देवळाली येथील केंद्रीय विद्यालयातील १०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ते सर्व पास झाले असून विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यातील ६ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए अर्थात पूर्ण गुणांक मिळाले आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर
By admin | Published: June 04, 2017 2:46 AM