नाशिक : इलेक्ट्रिकचे काम करण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या भामट्याने वृद्धेस मारहाण करीत हातातील बांगड्या बळजबरीने काढून पोबारा करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी २४ तासांच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे हुडकून काढले, जुगार खेळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील नथू ढाके (५०, रा.अष्टविनायक कॉलनी, आयटीआय सिग्नल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत सत्यभामा हिरामण पाटील (८५) या वृद्धा जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी तेजस प्रशांत सोनवणे (रा.संभाजी चौक, उंटवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तेजस याची वयोवृद्ध आजी -आजोबा परिसरातील संभाजी चौकातील येथील एनार्च सोसायटीत राहतात. हिरामण पाटील (८८) हे फेरफटका मारण्यासाठी परिसरात गेले असता सत्यभामा पाटील या एकट्या घरात असताना संशयित घरी आला. मी वायरमन असून, काम करण्यासाठी पाठविल्याचे सांगत त्याने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने घराचे दार बंद करीत थेट वृद्धेचे तोंड दाबून हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. बेसावध असलेल्या वृद्धने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने वृद्धेस मारहाण केला. तरीही धाडसी वृद्धेने प्रतिकार सुरूच ठेवल्याने त्याने त्यांच्या डाव्या हातास चावा घेतला, परंतु तरीही भामट्याने बळजबरीने त्यांच्या हातातील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी काढून घेत पोबारा केला होता. याबाबत तक्रार दाखल होताच आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, समीर शेख तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक आनंदा वाघ आणि मुंबई नाकाचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ज्या ठिकाणी घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पथके तयार करून संशयिताचा शोध घेतला. गुरुवारी (दि.२१) मध्यरात्री तो घरी पोहोचला असता पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.
वृद्धेचे दागिने ओरबाडणारा भामटा सीसीटीव्हीमुळे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:46 PM