नाशिक- सुरक्षिततेसाठी तिसरा डोळा म्हणून नाशिक शहरातील ४६ चौकांत सीसीटीव्ही बसवण्याचे काम तीन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतले आणि नंतर हे काम राज्य शासनाच्या महाआयटीकडे दिले. त्यानंतर कंपनीच्या मुख्यालयात कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांत केवळ स्मार्ट रोडवर मेहेर चौकात कॅमेरा बसवला असून उर्वरित चौक तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर एकही कॅमेरा बसलेला नाही. कंपनीच्या नुकत्याच झालेल्या संचालकांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली; परंतु इलेक्ट्रिक मीटरच्या उपलब्धतेचे निमित्त करून ते पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर ढकलण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीच्या प्रत्येक कामाचा कसा बोजवारा उडत आहे, त्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये कुंभमेळ्याच्या दरम्यान घेतला त्यानंतर कायमस्वरूपी कॅमेरे बसवण्याचे काम स्मार्ट सिटीकडे सोपवण्यात आले. त्यासाठी एकूण ४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यात शहरातील प्रमुख चौकात कॅमेरे बसवल्यानंतर त्याचे नियंत्रण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्यालयात कमांड ॲण्ड कंट्रोल स्टेशन उभारण्यात आले. या कक्षातून शहरातील प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, हे काम राज्य शासनाच्या सूचनेनुसार महाआयटीला देण्यात आले. त्यासाठी शासनाची विशेष परवानगी घेऊन चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले.
सुरुवातीला शहरातील ४६ चौक, ज्या ठिकाणी सिग्नल आहे, अशी ठिकाणे निश्चित करण्यात आली. स्मार्ट रोडपासून सुरुवात करण्याचे ठरवण्यात आले. २०१९ च्या मेपर्यंत ४६ चौकांत कॅमेरे बसवण्यात येणार होते. मात्र, २०२१ सालातील जुलै उजाडला तरीही अद्याप कॅमेरे बसवण्याचे काम झालेले नाही.
गेल्या २ जुलैस यासंदर्भात कंपनी संचालकांची बैठक झाली त्यावेळी महाआयटीशी त्याच वेळी संपर्क करण्यात आला. त्यावेळी सीसीटीव्हीसाठी लागणारे विजेचे मीटर्स कोणी उपलब्ध करायचे, असा तंटा पुढे आला. त्यावेळी स्मार्ट सिटीचे अवतार कार्य संपल्यानंतर सीसीटीव्हीची जबाबदारी महापालिकेकडे असेल त्यामुळे महापालिकेनेच हे मीटर द्यावे, असा निर्णय देखील घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांत शहरात ४६ पैकी केवळ एकाच चौकात कॅमेरे बसू शकल्याचे या बैठकीत सांगण्यात आल्याने कंपनीच्या संथ कारभाराची कल्पना येते. कॅमेरेच न बसल्याने तूर्तास स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यलयात गेल्यानंतर प्रत्येक अभ्यागताला दाखवले जाणारे कमांड कंट्रोल सेंटर हे केवळ शोभेपुरते असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
इन्फो...
नाशिक शहरात विविध चौकांत आणि अन्य संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येतील. सर्व शहरात कॅमेरे बसणार नसल्याने नागरिकांना मदतीची हाक देण्यात आली. नागरिकांनी कंपनीच्या तांत्रिक निकषानुसार कॅमेरे बसवून त्याचे इन्स्टॉलेशन चार्जेस कंपनीला भरल्यास त्यांच्या घराचे चौक देखील कमांड ॲण्ड कंट्रोल रूमशी जोडण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, अजून कंपनी अवघे ४६ कॅमेरे देखील बसवू शकलेली नाही. त्यामुळे अशाप्रकारे लोकसहभागातून खरोखरीच योजना यशस्वी होईल काय, याविषयी शंका आहे.